स्पर्श

Uncategorized

स्पर्श या शब्दाची परिभाषा सांगता येणार नाही कारण पण ती फक्त अनुभवली जाऊ शकते. तरी अट्टाहास करून या बद्दल थोडं शब्दात मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करते. स्पर्श हा अनेक तऱ्हेने अनुभवता येतो. ज्याप्रमाणे हवेला ना आकार असतो ना रंग पण केवळ स्पर्शातून आपण तिला अनुभवू शकतो. रखरखत्या उन्हात वाऱ्याची मंद झुळूक जेव्हा अलगदपणे आपल्याला स्पर्श करून जाते, तो एक सुखद अनुभव असतो जो आपण स्पर्शामुळे अनुभवू शकतो. स्पर्शातून विविध प्रकारचे भाव व्यक्ती अनुभवत असते. जसं की माया,प्रेम,राग, सेवा आणि बरच काही. प्रत्येक वेळी आईने मायेने डोक्यावरून फिरवलेला तिचा हात आपल्याला ममता देऊन जातो. सर्व दुःख विसरून एक विलक्षण शांतीचा अनुभव आपण करतो ते फक्त तिच्या मायेने भरलेल्या स्पर्शामुळे.
पहिल्या क्षणाला प्राण्यांसारखे भांडणारे भाऊ बहीण दुसऱ्याच क्षणी एकत्र खेळताना एकमेकांची काळजी करताना दिसतात त्यांच्या मारण्या फटकारण्यातून त्यांचे निरागस प्रेम व्यक्त होत असतं. हातांच्या हळुवार होणाऱ्या स्पर्शातून एकमेकांवर असलेले निखळ प्रेम प्रियकर-प्रेयसी अलगदपणे व्यक्त करतात. नवीन लग्न झालेलं जोडपं नकळतपणे होणार्‍या त्यांच्या स्पर्शामुळे मनात निर्माण होणाऱ्या भावनांच्या कल्लोळातून गुलाबी प्रेमाचा अनुभव घेतात.एकमेकांची होणारी नवीन ओळख ते अनुभवत असतात. याउलट आपल्या चुकांसाठी आपल्याला मारणारे शिक्षक आपण पुन्हा तीच चूक करू नये या भावनेने आपल्याला धपाटे घालत असतात. त्यातून सुधारण्याची भावना व्यक्त होते. रुसलेल्या दोन मैत्रिणी उगाचच एकमेकींना कोपराने धक्का देतात, का तर दुसरीला जाणीव व्हावी की बाबा मला तुझा राग आलाय. तू राग शांत कर माझा म्हणजे पुन्हा निवांत गप्पा मारत बसू. स्पर्शाबद्दल अत्यंत सुंदर शब्दात सांगायचं म्हटलं तर अत्यंत नाजूक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतोय. बराच लांबवरचा प्रवास करून जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वर दर्शनाच्या आशेने मार्गक्रमण करत असते तेव्हा भगवंताचा वास असलेल्या त्या नगरीत पोहोचल्या नंतरच जीवाला एका विलक्षण शांतीचा भास होतो. ईश्वराच्या चरणाचा स्पर्श जेव्हा मस्तकाला होतो तेव्हा जणू काय देवाने आपल्याला त्याच्या जीवनात स्थान दिलं याची प्रचीती होते. ईश्वराच्या चरणी स्पर्शाने संपूर्ण देह तृप्त होऊन जातो. कोणताही नकारात्मक भाव मनात असेल तर तो देखील खूप दूर निघून जातो. सकारात्मक ऊर्जेने,भक्तीने, विश्वासाने मन अगदी शांत होऊन जातं आणि विलक्षण सुख उपभोगू लागतं.
शेवटी सांगायचे एकच की स्पर्श हा शब्द जरी एक असला तरी मात्र अनेक भावना व्यक्त करण्यास उपयुक्त ठरतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *